महाराष्ट्रद्रोह्यांना छत्रपतींची जनता माफ करणार नाही, बाळासाहेब थोरात भडकले
![Ministry of Co-operation was set up, but the intention of the Central Government is still unclear](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Balasaheb-Thorat.jpg)
मुंबई | “गेल्या काही दिवसांपासून जे भाजपच्या पोटात आहे ते अभिनेत्री कंगना रनौतच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. कंगनाला पुढे करुन मुंबई पोलीस, मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जनता कदापी माफ करणार नाही”, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे.
“ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगना रनौतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्या मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आहे. हा महाराष्ट्रातील 13 कोटी मराठी माणसांचा अपमान आहे”, असा घणाघात बाळासाहेब थोरातांनी केला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/WhatsApp-Image-2020-09-04-at-4.24.23-AM.jpeg)
“बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत”, असं टीकास्त्र बाळासाहेब थोरात यांनी सोडलं आहे.