breaking-newsमुंबई

महाभरतीची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार!

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे राज्य सरकारच्या ७२ हजार नोकऱ्यांच्या महाभरतीची प्रक्रिया थांबवली होती. आता मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्याने मेगाभरतीची प्रक्रिया तात्काळ सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. भाजप-शिवसेना सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या लोकहिताच्या कामगिरीमुळे महाराष्ट्रातील जनता युती सरकारला पुन्हा आशीर्वाद देईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्यावरील कर्जाचा डोंगर व ढासळलेली आर्थिक परिस्थिती, उद्योगक्षेत्रातील गुंतवणुकीच्या करारांचे वास्तव, पायाभूत सुविधा प्रकल्पांची रखडलेली कामे याबाबत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१५ मध्ये मुंबईतील किनारपट्टी रस्त्यासह शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसारख्या पायाभूत प्रकल्पांबाबत मोठमोठय़ा घोषणा केल्या, पण त्या सर्व फसव्या ठरल्या, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी केली. त्याचबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले.

तर राज्य सरकार कर्ज काढून सण साजरा करत असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सनातन संस्थेच्या कारवाया आणि त्या रोखण्यात सरकारला अपयश आल्याबाबत टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सर्व प्रश्नांना आकडेवारीसहित उत्तरे दिली. राज्यात पंतप्रधान आवास योजनेची कामे ग्रामीण व शहरी भागांत वेगाने सुरू असल्याचे सांगत त्यांनी मंजूर कामे व घरांची सुरू असलेली कामे यांचा लेखाजोखा मांडला. नागपूर मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा मार्च २०१९ पर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. परकीय गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून गेल्या तीन वर्षांत ३ लाख ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याची माहिती त्यांनी दिली.

सनातन संस्थेविरोधात भाजप सरकारने जितकी कारवाई केली तितकी कॉंग्रेस सरकारनेही केली नव्हती असे सांगत महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकामुळेच कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश, प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येशी संबंधित गुन्हेगारांना पकडण्यात कर्नाटक पोलिसांना यश आले. उजव्या विचारसरणीचे असो की डाव्या, जे कोणी चुकीचे काम करत आहे त्यांच्यावर भाजप सरकार कारवाई करत आहे, असेही फडणवीस यांनी ठणकावले.गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या विरोधातील चौकशी अहवाल लवकर द्यावा, अशी विनंती लोकायुक्तांना करण्यात येईल. या प्रकरणात गरज पडल्यास आपणही चौकशीला येण्यास तयार आहोत, असे लोकायुक्तांना पत्राद्वारे कळवले होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नवी मुंबई विमानतळ एप्रिल २०२० पर्यंत सुरू होणार

नवी मुंबई विमानतळाचा प्रकल्प आणि शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पांच्या सर्व परवानग्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारला १५ वर्षांत मिळवता आल्या नाहीत. भाजप-शिवसेना सरकारने त्या मिळवल्या आणि आता प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे. नवी मुंबई विमानतळाची एक धावपट्टी आणि एक टर्मिनल एप्रिल २०२० पर्यंत सुरू होईल, तर शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्प डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. मुंबईतील किनारपट्टी रस्ता बांधण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर विरापर्यंतचा पट्टा सागरी सेतूने जोडण्याचा राज्य सरकारचा विचार असून त्याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button