breaking-newsमुंबई

मशीद बंदर, सॅन्डहर्स्ट रोड सरकत्या जिन्यांपासून वंचित

  • जागेअभावी जिने उभारण्यात अडथळे

मुंबई – अनेक रेल्वे स्थानकांत सरकत्या जिन्यांची सुविधा दिली जात असताना मशीद बंदर व सॅन्डहर्स्ट रोड ही वर्दळीची स्थानके, मात्र जागेअभावी या सुविधेपासून वंचित राहणार आहेत. मध्य रेल्वेवरील या स्थानकांना सरकत्या जिन्यांपासून दूरच राहावे लागणार आहे.

सर्वसामान्य प्रवासी विशेषत वृद्ध व गर्भवतींना डोळ्यांसमोर ठेवून रेल्वे स्थानकातील फलाटांवर सरकते जिने बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या मध्य रेल्वेच्या ४७ स्थानकांत ७२ सरकते जिने बसवण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, करी रोड, भायखळा, घाटकोपर, विक्रोळी, माटुंगा, मुलुंड, नाहूर, वडाळा, चेंबूर, अंबरनाथ, कसारा, आसनगाव, शहाड यासह अन्य काही स्थानकांत सरकते जिने आहेत. चिंचपोकळी स्थानकात एक सरकता जिना बसवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने यापुढे येत्या काही वर्षांत १७२ सरकते जिने बसवण्याचे नियोजन केले आहे.

मोठय़ा संख्येने सरकते जिने बसवले जातानाच मध्य रेल्वेवरील वर्दळीची मशीदबंदर व सॅन्डहर्स्ट रोड स्थानके या सुविधेपासून वंचित राहणार आहेत. सॅन्डहर्स्ट रोड स्थानकात मुख्य मार्गाचे दोन आणि हार्बर मार्गाचे दोन फलाट आहेत. तर मस्जिद बंदर स्थानकात मुख्य व हार्बरसह चार फलाट आहेत. मोठय़ा संख्येने कामगार वर्ग आणि स्थानिकांची या दोन स्थानकातून ये-जा असते. सॅन्डहर्स्ट रोड स्थानकातूनच दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३६ हजार ७३२, तर मशीदबंदर स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या ३४ हजारांपर्यंत आहे. तरीही या ठिकाणी सुविधांची बोंबच आहे. यामधून आता सरकते जिनेही बसविले जाणार नसल्याचे समोर आले आहे.

सॅन्डहर्स्ट रोड स्थानकात मुख्य मार्गावर सीएसएमटीच्या दिशेला एक पादचारी पूल असून येथे सरकता जिना जोडता येणे अशक्य आहे. हार्बरच्या फलाटावरही तीच परिस्थिती आहे. मशीदबंदर रेल्वे स्थानकातही दोन पुलांना सरकता जिना जोडण्यासाठी जागाच नाही. जिना जोडण्यासाठी त्याचे काम करताना लागणारी मोठी जागा ही रेल्वेसमोर मोठी अडचण आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांत सरकते जिने बांधण्याचा विचार करण्यात आला नसल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button