मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्याच्या प्रकरणावर २७ ऑक्टोबरला होणार सुनावणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/court-5.gif)
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्याच्या प्रकरणावर २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. स्थगिती उठवण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा समाजाचं या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबरला अंतरिम स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात बदल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या कोल्हापूर मेळाव्यात करण्यात आली होती. इतकंच नाही, तर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, ‘मराठ्यांची ताकद दिल्लीत दाखवू’ असा इशाराही मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.