मनसे आक्रमक, मंत्रालयासमोरील रस्ता खोदला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/mns-protest.jpg)
मुंबई – खड्ड्यांवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून सोमवारी रात्री उशिरा कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोरील रस्ता खोदून सरकारचा निषेध केला.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली या भागांमध्ये सध्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. खड्ड्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून आता यावरुन मनसेही आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री उशिरा मंत्रालयसमोरील रस्ता खोदून सरकारचा निषेध केला. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनाही व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सोमवारी देखील मनसेने खड्ड्यांवरुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली.