breaking-newsमुंबई

मध्य रेल्वेवर रोज ७४ हजार प्रवाशांची भर

  • एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत उपनगरी सेवेच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ

वाढलेल्या लोकलफेऱ्या, हार्बरचा गोरेगावपर्यंतचा विस्तार, नेरुळ-खारकोपर लोकल सेवा अशा विविध कारणांमुळे मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्येत प्रचंड भर पडत आहे. या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेवरील लोकल गर्दीत दररोज ७४ हजार प्रवाशांची भर पडत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील दररोजची प्रवासी संख्या आता ४२ लाख ७४ हजार एवढी झाली आहे.

मध्य रेल्वेवरील उपनगरीय पसारा सीएसएमटी ते कर्जत, कसारा, खोपोली आणि वाशी, पनवेल, अंधेरी आणि गोरेगावपर्यंत आहे. या मार्गावर गेल्या काही वर्षांत प्रवाशांची पडणारी भर पाहता लोकलवर ताण वाढतच आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार लोकल गाडय़ा व फेऱ्यांचीही संख्या वाढवली जात आहे. आता २०१८ मध्ये प्रवासी संख्येत आणखी भर पडल्याने मध्य रेल्वेवर ताण वाढला असल्याचे अधिकारी सांगतात.

मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या मागणीनुसार ऑक्टोबर २०१७ पासून ४६ लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये आणखी २६ फेऱ्यांचीही भर पडली. या फेऱ्यांमध्ये मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गाबरोबरच हार्बर, ट्रान्स हार्बरचाही समावेश होता. अंधेरीपर्यंत असलेल्या हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार केल्यानंतर ४२ फेऱ्यांचा विस्तारही करण्यात आला. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या हार्बरवरील अंधेरीपर्यंत असलेल्या लोकल फेऱ्याही गोरेगावपर्यंत चालविण्यास सुरुवात केली.

मध्य रेल्वेवरील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या नेरुळ-उरण मार्गावरील पहिला टप्पा नेरुळ-खारकोपर मार्गही १२ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत आला. हा मार्ग सेवेत येताच चांगला प्रतिसाद मिळू लागला. या मार्गावरील प्रवासी संख्याही अल्पावधीतच वाढत चालली आहे.

महसुलात २२ कोटींची वाढ

वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे मध्य रेल्वेच्या महसुलातही भरघोस वाढ झाली. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबपर्यंत ७०० कोटी रुपयांपर्यंत असलेल्या महसुलात यंदा २२ कोटी रुपयांनी वाढ झाली. मध्य रेल्वेच्या उत्पन्नातील वाढ ही सव्वा तीन टक्के आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button