भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद नजरकैदेत
मुंबई : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद अद्यापही पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. मालाड इथल्या मनाली हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चंद्रशेखर आझाद यांना भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आझाद यांच्या राज्यातील होणाऱ्या सभा आणि कार्यक्रम होऊ नये याची पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु केल्याचा आरोप भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांना चैत्यभूमीवर पोहोचण्यापूर्वीच काल अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. आझाद यांना पोलिसांनी कुठे नेलंय याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नव्हती. मात्र आझाद हे हॉटेल मनालीमध्येच नजरकैदेत आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या गाडीतून चंद्रशेखर आझाद यांनी फेसबुक लाईव्ह केलं. हे महाराष्ट्राचे पोलीस प्रशासन बघा आम्हाला कसं अटक केलं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला झुकायला शिकवलं नाही, असं वक्तव्य चंद्रशेखर आझाद यांनी फेसबुक लाईव्हमध्ये केलं. पण पोलिसांनी हे फेसबुक लाईव्ह मध्येच बंद केलं.
दिवसभर नजरकैदेत
चंद्रशेखर आझाद हे पहिल्यांदाच मुंबई आणि महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मात्र वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवलं. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं विजय दिवस साजरा केला जाणार आहे. भीमा कोरेगाव संघर्ष महासभेत चंद्रशेखर आझाद हे भाषण देणार आहेत. मात्र गेल्या वर्षी झालेला हिंसाचार लक्षात घेता, पोलिसांनी प्रचंड खबरदारी घेतली आहे.