भारत-फ्रान्स नौदलाच्या संयुक्त युद्धसरावाला प्रारंभ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/war-ship.jpg)
गोवा किनारपट्टीवर १० मेपर्यंत उपक्रम
मुंबई : गोव्यानजीकच्या समुद्रात भारत आणि फ्रान्स नौदलांच्या संयुक्त युद्धसरावाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. वरुण १९.१ या नावाने होणाऱ्या या सरावात भारत आणि फ्रान्सच्या विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, फ्रीगेट, तेज-फ्रीगेट प्रकारातील युद्धनौका यांचा समावेश आहे.
फ्रान्स नौदलाच्या अणू पाणबुडीचा आणि भारतीय नौदलाच्या शिशुमार वर्गातील पाणबुडीचा समावेश यामध्ये आहे. गोव्यात समुद्रकिनारी आणि समुद्रात अशा दोन ठिकाणी हा युद्धसराव होत आहे. भारतीय नौदलातील आयएनएस विक्रमादित्य, आयएनएस मुंबई, आयएनएस टर्कश आणि आयएनएस दीपक या युद्धनौकांनी यामध्ये भाग घेतला आहे. हा युद्धसराव १० मेपर्यंत सुरू असणार आहे.
वरुण १९.२ हा या सरावाचा दुसरा भाग मे महिन्याच्या अखेरीस जिबौती येथे होणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील हा संयुक्त नौदल सराव १९८३ साली सुरू करण्यात आला असून २००१ मध्ये त्याचे नामकरण ‘वरुण’ असे करण्यात आले होते.
प्रस्थान सुरक्षा सराव
मुंबईनजीकच्या समुद्रातील व्यावसायिक उपयोगिता सुरक्षा क्षेत्रात ‘प्रस्थान’ हा सुरक्षा सराव ३० एप्रिलला घेण्यात आला. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाच्या देखरेखीखाली दर सहा महिन्यांनी हा सुरक्षा सराव घेण्यात येतो. भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, तटरक्षक दल, ओएनजीसी, पोर्ट ट्रस्ट, सीमाशुल्क विभाग, राज्य मत्स्य व्यवसाय विभाग, सागरी पोलीस यांचा सहभाग या सुरक्षा सरावात करण्यात आला होता. समुद्रातील व्यावसायिक उपयोगिता सुरक्षा क्षेत्रात काही आकस्मिक घटना घडल्यास त्याला प्रतिसाद देण्याची प्रक्रिया तपासण्यासाठी हा सराव केला गेला. ओएनजीसीच्या हिरा प्लॅटफॉर्मवर हा सराव घेण्यात आला.