भारतीय पोलिस जगातील सर्वोत्कृष्ट;त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान: अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/dada-2.jpg)
‘पोलीस स्मृतीदिना’निमित्त शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई । प्रतिनिधी
भारतीय पोलिस जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस असून त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन ‘पोलीस स्मृती दिना’निमित्त शहिद पोलिस वीरांना अभिवादन केले आहे.
देशांतर्गत कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारतीय पोलिसांनी, प्रसंगी देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी सरहद्दीवर युद्ध लढलं आहे. सीमेवर शत्रूशी लढताना, दहशतवादाचा, नक्षलवादाचा बिमोड करताना अनेक पोलिसांनी हौतात्म्य पत्करलं आहे. कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी ते गेले आठ महिने जीवाची जोखीम पत्करुन अहोरात्र लढत आहेत. पाकिस्तान, चीनसारख्या शत्रूसैन्याशी लढण्यापासून मुंबईवरील दहशतवादी हल्ला नेस्तनाबूत करण्यापर्यंत अनेक आघाड्यांवर भारतीय पोलिसांनी अतुलनीय शौर्य गाजवलं आहे असेही अजित पवार म्हणाले.
नागरिकांच्या जिविताच्या, मालमत्तेच्या रक्षणाची, देशातंर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलिस अनेक आघाड्यांवर लढत असतात. देशात कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करुन नागरिकांना सुरक्षित व विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे पोलिसच असतात. पोलिस हे आपल्या सुरक्षेच्या बरोबरीने राष्ट्रनिर्माणाचेही काम करीत असतात. पोलिस दलातील आजी-माजी अधिकारी, जवान व त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस दलाबद्दलचा आदर व्यक्त केला.