बोरिवलीच्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरला आग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/fire_16.jpg)
मुंबई | बोरिवली पश्चिमेला स्टेशनजवळच्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरला मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या १४ बंबगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र आगीमुळे प्रचंड वित्तहानी झाली आहे.
शॉपिंग सेंटरला आज (शनिवार) सकाळी सहाच्या सुमारास ‘लेव्हल चार’ची आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावरुन आग सुरू झाली. ही आग पसरत गेली. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. आग लागल्यामुळे शॉपिंग सेंटरमध्ये व्यवसाय करणाऱ्या अनेक दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. माल जळून खाक झाला.
प्लॅस्टिक, कापड अशा अनेक प्रकारचा माल एकाचवेळी जळत असल्यामुळे शॉपिंग सेंटरमधून मोठ्या प्रमाणावर धूर येत आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. याआधी २३ जून रोजी मानखुर्द घाटकोपर लिंक रोड परिसरात स्क्रॅप कंपाउंडला सकाळी सहाच्या सुमारास ‘लेव्हल तीन’ची आग लागली होती. या आगीत भंगारात जमा झालेल्या वस्तू आणि तेलाचे डबे जळून खाक झाले होते. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. यानंतर २५ जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास लोअर परळ भागात रघुवंशी मिल कंपाउंड परिसरात ‘लेव्हल तीन’ची आग लागली होती.
या आगीमुळे मोठी वित्तहानी झाली होती. आता बोरिवलीत शॉपिंग सेंटरच्या आगीमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.