बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगला हस्तांतरित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/mayorbung.jpg)
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याची जागा पालिकेने मंगळवारी बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या हवाली केली. मात्र अद्यापही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निवासाची व्यवस्था प्रशासनाला करता आलेली नाही. त्यामुळे तूर्त निवासाची व्यवस्था होईपर्यंत विश्वनाथ महाडेश्वर यांना याच बंगल्यामध्ये वास्तव्य करावे लागणार आहे.या संदर्भातील काही सोपस्कार बुधवारी पूर्ण करण्यात येणार आहे, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आली असली तरी पालिका प्रशासनाला अद्याप महापौरांच्या निवासाची व्यवस्था करता आलेली नाही. महापौरांच्या निवासाची व्यवस्था भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यात करण्यात येणार आहे. मात्र सध्या तेथे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड वास्तव्यास आहेत. विधानसभा निवडणुकीचे निरीक्षक म्हणून आबासाहेब जऱ्हाड मध्य प्रदेशात गेले आहेत. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते मुंबईत परतू शकणार नाहीत. त्यामुळे बंगला तात्काळ रिकामा होऊ शकणार नाही. हा बंगला रिकामा झाल्यानंतर त्याला रंगरंगोटी करावी लागणार आहे. त्यानंतरच महापौरांना या बंगल्यामध्ये वास्तव्यास येणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.