breaking-newsआंतरराष्टीयमुंबईराष्ट्रिय

फेसबुकवरुन प्रेमात पडू नका, पाकिस्तानहून परतलेल्या हमीदचा तरुणांना सल्ला

पाकिस्तानी कारागृहात सहा वर्ष शिक्षा भोगल्यानंतर भारतात परतलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर हमीद अन्सारीने तरुणांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. फेसबुकवरुन प्रेमात पडू नका असं हमीद अन्सारीने तरुणांना सांगितलं आहे. हमीद अन्सारी फेसबुकवरुनच पाकिस्तानमधील एका तरुणीच्या प्रेमात पडला होता. भेटही झाली नसताना तिच्या मनाविरुद्ध होणारं लग्न थांबवण्यासाठी हमीद पाकिस्तानात गेला आणि त्याला अटक करण्यात आली. ही सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ही सहा वर्ष हमीद अन्सारीने पाकिस्तानच्या कारागृहात घालवली.

हमीद अन्साऱी अखेर सहा वर्षांनी पुन्हा आपल्या घरी परतला आहे. मुंबईतील आपल्या घरी आपल्या कुटुंबीयांसोबत पुन्हा एकत्र आला आहे. ‘आपल्या आई-वडिलांपासून काहीच लपवू नका. जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा फक्त आई-वडील तुमच्या बाजूने उभे असतात. कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब अजिबात करु नका’, असं हमीदने सांगितलं आहे.

यावेळी त्याला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमात पडणाऱ्यांना काय सल्ला देशील असं विचारलं असता त्याने सांगितलं की, ‘ती जोखीम पत्करु नका. प्रेमात पडू नका. फेसबुकवर जे काही असतं त्याच्यावर विश्वास ठेवत प्रेमात पडू नका’, असं हमीदने सांगितलं. दिल्लीत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतल्यानंतर हमीद आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील वर्सोवा येथील घऱी पोहोचला. शेजाऱ्यांनी हमीदच्या स्वागताची पूर्ण तयारी केली होती.

हमीदने आपली सुटका होईल याची कल्पनाही नव्हती असं सांगितलं. ‘मंगळवारी सकाळी 6.30 वाजता कारागृह उप अधीक्षक आले आणि मला तुझी सुटका होत असून तयारी करण्यासाठी फक्त अर्धा तास असल्याचं सांगितलं. मी प्रचंड आनंदात होतो. एकही क्षण वाया घालवायचा नाही असं ठरवलं. कपडे बदलले, बूट घातले आणि मी गाडीत जाऊन बसलो. ताफा पूर्णपणे तयार होता’, असं हमीद सांगत होता.

हमीद अन्सारीने फेसबुकवर मैत्री झालेल्या तरुणीला भेटण्यासाठी 2012 रोजी अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात प्रवेश केला होता. हेरगिरीचा आरोप लावत त्याला अटक करण्यात आली होती. अखेर सहा वर्षांनी त्याची सुटका करण्यात आली आणि वाघा-अटारी बॉर्डरवरुन भारताच्या हवाली करण्यात आलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button