परदेशातून आलेल्यांना क्वारंटाइनमधून सूट देण्यासाठी घेतली लाच, तिघांना अटक
मुंबई – ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्याने भारतातील सर्वच विमानतळांवर पुन्हा एकदा कठोर तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यातच, मुंबई विमानतळावरूनही प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. १५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यावरच त्यांना घरी सोडण्यात येत आहे. मात्र, विदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमधून सूट देण्यासाठी लाच घेताना इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार इंजिनिअरला परदेशी नागरिकांकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. दिनेश गवांडे असं इंजिनिअरचं नाव आहे. त्यांच्यासोबत आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. दिनेश गवांडेकडे क्वारंटाइनमधून सूट देण्यासाठी विदेशी नागरिकांकडून घेण्यात आलेले पैसे, बनावट शिक्का जप्त करण्यात आला आहे. आरोपीनं बनावट शिक्का कसा बनवला, याचा तपास पोलीस करत आहे.
नियमांना हरताळ फासत विदेशी नागरिकांकडून लाच घेणाऱ्या इंजिनिअरला निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर चौकशी सुरू करण्यात आली आहे. २१ डिसेंबर २०२० पासून मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे निर्बंध कडक केले होते. त्याचबरोबर परदेशातून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण आवश्यक केलेलं आहे. या क्वारंटाइनमधून वाचवण्यासाठी गवांडे पैसे घ्यायचा.