नागपूरमध्ये नाना पटोलेच्या उमेदवारीला नितीन राऊत गटाकडून विरोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/nn.gif)
नागपूर : नाना पटोले यांच्या नागपूरमधील उमेदवारीला काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या गटाने विरोध केल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. खैरलांजी हत्याकांडानंतर नाना पटोले यांनी आरोपींच्या बाजूने भूमिका घेतली होती, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पटोले यांना उमेदवारी देऊ नये, असा मेल कार्यकर्त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविला आहे.
नाना पटोलेंची लोकसभेची उमेदवारी दलित समाजाला दुखावणारी ठरेल. नागपूर संघाचे मुख्यालय असूनही नागपुरात सामाजिक सलोखा आजवर कायम राहिला. दलित आणि कुणबी समाजात तेढ निर्माण झालेली नाही. मात्र, नाना पटोले यांना उमेदवारी दिल्यास तो सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकेल, अशी शक्यता ई मेलव्दारे राहुल गांधी यांच्याकडे व्यक्त करण्यात आली आहे.
नाना पटोलेंच्या उमेदवारीला काँग्रेसच्याच एका गटाकडून अंतर्गत विरोध होत असल्यामुळे नागपूर काँग्रेसमध्ये राजकारण तापले आहे. राऊत लोकसभा लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, पटोले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पटोलेंच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी पटोलेंच्या विरोधातील तक्रारीवर काय निर्णँय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.