नाइट लाइफ सरसकट मुंबईत राबवणार नाही – अनिल देशमुख
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/night-life.jpg)
मुंबई | महाईन्यूज
राजधानी मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असले तरी, मुंबईत सरसकट सर्व ठिकाणी हे धोरण राबवणार नाही; तर बीकेसी, लोअर परेल, मॉल व मिल कंपाउंडच्या आतील रेस्टॉरंटमध्येच राबविले जाईल, अशी भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलेली आहे.
नाइट लाइफ म्हणजे केवळ व्यभिचार असा समज चुकीचा असल्याचे सत्ताधारी नेत्यांचे मत आहे. नाइट लाइफ सुरू करणे यामागे शहरातील उद्योग व व्यवसाय वाढीला प्रोत्साहन देणे हा आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना मिळणार असून, रोजगारातही वाढ होणार असल्याचे सरकारचे मत आहे. मात्र, या निर्णयामुळे मुंबईत सरसकट सगळी हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू होणार असतील तर नाइट लाइफचा निर्णय राबविणे आव्हान असल्याचे सुतोवाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. नाइट लाइफचा प्रस्ताव काही विशिष्ट जागेतील हॉटेल्स, मॉल व कंपाउंडच्या आतील जागेतच राबवणे शक्य असल्याची कबुली अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुल, लोअर परेल, मरीन ड्राइव्ह ही ठिकाणे महत्त्वाची असल्याचे गृहमंत्र्यांनी सूचित केले आहे.