नव्या वर्षात नवा नियम; मोबाईल नंबरमध्ये नवा अंक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/मोबाईल-नंबरमध्ये-नवा-अंक.jpg)
मुंबई – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने मोबाईलवर कॉल करण्यासाठी ‘0’ जोडण्याची शिफारस केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडे केली होती. ही शिफारस अखेर मान्य करण्यात आली असून आता 1 जानेवारीपासून आपल्या लँडलाईनवरून कोणताही मोबाईल नंबर डायल करण्यापूर्वी आपल्याला ‘0’ नंबर जोडावा लागणार आहे.
भारतात मोबाईल फोनवरून कॉल करण्याचे नियम लवकरच बदलणार आहेत. लँडलाईनवरून मोबाईलवर नंबर डायल करण्याची पद्धत बदलण्यासाठी ट्रायच्या शिफारशी मान्य केल्या गेल्या असून आता लँडलाइनवरून मोबाईलवर फोन करण्यासाठी आधी 0 जोडणे आवश्यक आहे. 20 नोव्हेंबरला जारी केलेल्या परिपत्रकात दूरसंचार विभागाने ही माहिती दिली आहे. यामुळे मोबाईल आणि लँडलाईन सेवांसाठी पुरेसे नंबर नव्याने तयार करणे सहजसोपे होणार आहे. ही सुविधा सध्या आपल्या प्रदेशाबाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहितीसुद्धा दूरसंचार विभागाने दिली आहे. तर टेलिकॉम कंपन्यांना ही नवीन यंत्रणा लागू करण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.