नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण
मुंबई- कोरोनाच्या संसर्गाशी नेटाने लढणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारची चिंता वाढवणारी बातमी आहे. सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर सर्व आमदारांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये तनपुरे यांना लागण झाल्याचे आढळून आले आहे. तनपुरे यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. पुरेशी काळजी घेत होतो. मात्र, कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तनपुरे कोरोना काळात आपल्या मतदारसंघात, जिल्ह्यात आणि राज्यातही दौरे करीत होते. त्यांच्या उपस्थिती विविध उपक्रम, बैठका पार पडल्या. मतदारसंघासोबतच नगर शहरातही ते सक्रिय होते. अंतिम वर्ष परीक्षा विषयात त्यांनी सुरुवातीपासून लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ऐन अधिवेशानाच्या वेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने त्यांना अधिवेशनात भाग घेता आला नाही.