धारावीत 9 नव्या कोरोना रुग्णाची नोंद; एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 हजार 626 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/what-is-turning-dharavi-into-a-virus-nightmare-of-such-magnitude.jpg)
मुंबईतील कोरोनाची परिस्थिती ही नेहमी चढ-उतार होताना पहायला मिळतेय. धारावीतील कोरोना विषाणूचा विळखा कधी कमी कधी जास्त झाल्याचं चित्र दिसून येत आहे. जागतिक पातळीवर दखल घेतल्या गेलेल्या धारावी झोपडपट्टीत आज 9 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 हजार 626 वर पोहोचली आहे.
सध्या धारावीतील 79 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत धारावीतील 2 हजार 289 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.
चार महिन्यांपूर्वी धारावी हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र आता धारावीत कोरोना नियंत्रणात आला आहे. रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपक्रमामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईमध्ये 1 हजार 66 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 23 हजार 397 वर पोहोचला आहे. याशिवाय काल राज्यात 12 हजार 248 नव्या रुग्णांची नोंद झाली.