धनंजय मुंडेंविरोधात तक्रार केलेली रेणू शर्मा पुन्हा पोलिस ठाण्यात दाखल
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दिलेली महिला पुन्हा एकदा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. तक्रारदार रेणू शर्मा असून ती डी.एन. नगर पोलिस ठाण्यात पोहोचली आहे. डी.एन. नगर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांची ती भेट घेणार आहे. आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती ही महिला सहाय्यक पोलीस आयुक्तांना देणार आहे. याआधी रेणू शर्मा हीने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वाचा :-काय निर्णय घ्यावेत? राष्ट्रवादीचे नेते जाणतात; धनंजय मुंडे यांच्यावरून काय म्हणाले संजय राऊत
रेणू शर्मा नावाच्या एका गायिकेने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी आपल्याला बॉलिवूडमध्ये संधी देण्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून सातत्यानं बलात्कार केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात १० जानेवारीला तक्रार केली. याप्रकरणी ११ जानेवारीला रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. तरुणीने केलेल्या आरोपांनुसार २००६ पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली बाजू सविस्तरपणे मांडली आहे.
दरम्यान, सध्या धनंजय मुंडे मुंबईतील आपल्या शासकीय निवासस्थानावर आहेत. सकाळपासून कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी गर्दी करताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (१४ जानेवारी) बैठक होणार आहे. यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्य़ावर काय चर्चा होणार? काय निर्णय घेतला जाणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.