धक्कादायक! वरळीत BMW गाडीचा अपघात; ६ महिन्यांच्या चिमुरडीसह तिघांचा मृत्यू
भरधाव वेगानं जाणारी बीएमडब्ल्यू गाडी दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात ६ महिन्यांच्या चिमुरडीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वरळीतील खान अब्दुल गफार खान मार्गावर हा अपघात झाला. भरधाव वेगानं जाणाऱ्या बीएमडब्ल्यूच्या चालक महिलेचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे ती गाडी दुभाजकावर जाऊन आदळल्यानं अपघात झाला. यानंतर जखमींना त्वरित जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, या अपघातात चालक महिला सोडून गाडीतील अन्य तिघांचाही जागीच मृत्यू झाला. यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे.
सदर महिलाही पुण्यात राहत असून ती मुंबईत आपल्या आईच्या घरी आली होती. आपल्या गाडीतून बाहेर जात असताना हा अपघात झाला. चालक महिलेला रूग्णलयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. त्या महिलेची प्रकृती गंभीर असून आम्ही पुढील तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.