धक्कादायक! खासगी छायाचित्रांच्या आधारे इन्स्टाग्रामवरून खंडणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/instagram1.jpg)
वसई | महाईन्यूज
एका जोडप्यांची खासगी आणि आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत इन्स्टाग्रामवरून खंडणी मागितल्याचे प्रकरण वसईत उघडकीस आले आहे. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवरून खंडणी मागितल्याचे हा पहिलाच गुन्हा वसईत दाखल झालेला आहे.वसईच्या माणिकूपर पोलीस ठाण्यात राहाणाऱ्या एका अल्पवयीन जोडप्यांचे प्रेमसंबंध होते.
काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका अनोळखी अकाऊंटवरून संदेश आला होता. या संदेशात या जोडप्याची एक आक्षेपार्ह चित्रफीत टाकून ही चित्रफीत इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली होती. जर हे थांबवायचे असेल तर ९० हजार रुपये खंडणी देण्याची मागणी त्याने केली. विशेष म्हणजे ही खंडणी बिटकॉईनच्या माध्यमातून त्याने मागितली होती. फिर्यादी तरुणाने तडजोड करून ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र ही चित्रफीत आणि छायाचित्रे त्या अनोळखी व्यक्तीकडून गैरवापर होण्याची त्याला भीती होती. त्यामुळे शेवटी त्याने माणिकूपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३८४ अन्वये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.