दीपिका पादुकोण एनसीबी कार्यालयात हजर, चौकशी सुरू
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूड सिनेसृष्टी गदागदा हलवली आहे. या मृत्यूप्रकरणात समोर आलेल्या ड्रग्स अँगलबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)कडून चौकशी सुरू आहे. एनसीबीच्या चौकशीत बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. आज यापैकी दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तिघींची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी केली जाणार आहे. दीपिकाला आज सकाळी 10 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, त्यानुसार दीपिका एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून तिची चौकशी सुरू झाली आहे. एनसीबीतील मराठमोळे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांकडून तिची चौकशी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाची आज चौकशी होणार असल्याने तिच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मीडियानेही तिच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मात्र, दीपिका रात्रभर तिच्या घरी नव्हती. ती रात्रभर मुंबईतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेलात थांबली होती. त्यानंतर आज सर्वांना चकवा देत तोंडाला मास्क लावून दीपिका एका साध्या गाडीतून चौकशीच्या १५ मिनिटे आधीच एनसीबी कार्यालयात दाखल झाली.
दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना बोलावणे धाडले. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंहला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले. समन्स मिळाल्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण गुरुवारी मुंबईत दाखल झाली. तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळवले होते.