TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

दक्षिण मुंबईतील चौथा ब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा

‘महारेल’चा भविष्यात आणखी तीन उड्डाणपुलांवर पडणार हातोडा

मुंबई : ब्रिटिशांनी दक्षिण मुंबईत उभारलेले उड्डाणपूल हळूहळू इतिहासजमा होऊ लागले असून धोकादायक बनलेल्या कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम सध्या सुरू आहे. गेल्या सात वर्षांत पाडण्यात येणारा हा चौथा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल आहे. भविष्यात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन (महारेल) रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने आणखी तीन ब्रिटिशकालीन उड्डाणपूल पाडून त्याजागी नवे पूल बांधण्याच्या तयारीत आहे.

सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान १८६८ साली कर्नाक उड्डाणपूल बांधण्यात आला. दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा हा पूल महत्त्वाचा आहे. कर्नाक पूल पी.डीमेलो रस्त्याला पश्चिमेला जडण्यात आला आहे. या पुलाच्या खालून उपनगरीय रेल्वे, मेल-एक्स्प्रेस आणि यार्डच्या मार्गिका आहेत. हा पूल सहा खांबांवर उभारण्यात आला होता. गेल्या काही वर्षात या पुलावर मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरणही करण्यात आले आहे. कर्नाक उड्डाणपुलाला तडे गेले असून पुलाचा पायाही खराब झाला होता. तसेच त्याच्या खांबानाही तडे गेले आहेत. धोकादायक बनल्याने २२ ऑगस्ट रोजी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मध्य रेल्वे या पुलाचे पाडकाम करणार आहे. त्यानंतर महानगरपालिका येथे नवीन उड्डाणपुलाची उभारणी करणार आहे.

आतापर्यंत दक्षिण मुंबईतील तीन ब्रिटिशकालीन उड्डाणपूल पाडण्यात आले असून हा चौथा पूल इतिहास जमा होत आहे. यापूर्वी सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ १८७९ मध्ये बांधण्यात आलेला हँकॉक पूल धोकादायक बनल्याने २०१६ मध्ये पाडण्यात आला आणि त्या जागी नव्या पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र त्यासाठी बराच कालावधी लागला. लोअर परेल येथील डिलायल उड्डाणपुलही २४ जुलै २०१८ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाची उभारणीही ब्रिटिशकाळात झाली होती. पश्चिम रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका या उड्डाणपुलाची उभारणी करीत असून मार्च २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. चर्नी रोड आणि ग्रॅन्ट रोड स्थानकांदरम्यान १९२१ मध्ये उभारण्यात आलेला फरेरे उड्डाणपूल २०२० मध्ये पाडण्यात आला आणि पुर्नबांधणीनंतर तो नोव्हेंबर २०२१ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

ब्रिटिशकालिन आणखी तीन उड्डाणपूल हद्दपार होणार
महारेलने मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने दक्षिण मुंबईतील धोकादायक बनलेले आणखी तीन ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे नियोजन केले आहे. त्या जागी वांद्रे-वरळी सागरीसेतूच्या पद्धतीने केबल स्टेड उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. यामध्ये तीन उड्डाणपुलांचा समावेश आहे. प्रथम नवीन केबल स्टेड पुलाची उभारणी करण्यात येणार असून त्यानंतर रेल्वे हद्दीतून जाणारे जुने पूल पाडण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या त्यांच्या किरकोळ कामांनाही सुरूवात झाली आहे.

१. रे रोड – हा उड्डाणपूल १९१० साली उभारण्यात आला. पूल पाडून त्याजागी केबल स्टेड उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. नवीन पुलाची लांबी २८० मीटर असेल आणि १७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रे रोड रेल्वे स्थानकाजवळ हा उड्डाणपूल उभारल्याने माहुल रोड व बॅरिस्टर नाथ पै मार्गाचे रॅम्प नवीन प्रस्तावित पुलाला जोडण्यात येतील.

२. भायखळा – भायखळा आणि सॅन्डहर्स्ट रोड स्थानकांच्या मध्ये असलेला उड्डाणपूल १९२२ मध्ये उभारण्यात आला. आता उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाची लांबी ६५० मीटर असेल आणि पूल उभारणीचा अंदाजे खर्च २०० कोटी रुपये आहे.

३. दादर टिळक – पश्चिम आणि मध्य रेल्वे दादर रेल्वे स्थानकाच्या रुळावरून जाणारा हा उड्डाणपूल १९२३ मध्ये बांधण्यात आला होता. येथे बांधण्यात येणाऱ्या केबल स्टेड पुलाची लांबी ६०० मीटर असेल आणि नव्या पुलासाठी ३७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. टिळक पूल हा दादर पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारा पूल आहे.

मुंबईतील रेल्वे हद्दीतील तिसरा उड्डाणपूल बंद
मुंबईतील रेल्वे रुळावरून जाणारा तिसरा उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे. लोअर परेळ येथील डिलायल उड्डाणपूल, अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोखले उड्डाणपूल आणि आता सीएसएमटी-भायखळा स्थानकांदरम्यानचा कर्नाक उड्डाणपुलाचा त्यात समावेश आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button