तटकरे आणि मुंडे अजित पवारांना घेऊन ट्रायडंटच्या बैठकीत जाणार
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अवघ्या साडेचार दिवसांत आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आम्ही स्थिर सरकार आणू आणि ५ वर्षे हे सरकार टिकेल असा विश्वास दाखवणाऱ्या भाजपसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीची नेते मंडळी तसेच पवार कुटुंबियांनी अजित पवारांची वारंवार घेतलेल्या भेटींना यश आले आहे. अजित पवारांनी माझ्याकडे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपावल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच आपण स्वत: देखील राजीनामा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अजित पवार यांच्याशी आमचा संपर्क झाल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले. आता अजित पवारांवर राष्ट्रवादी काँग्रेस कारवाई करणार का ? अजित पवार राजकीय सन्यास घेणार का ? अशा चर्चांना उधाण आले आहे. या सर्व पार्श्वभुमीवर संध्याकाळी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वांद्रे येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक होत आहे. तीन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते या ठिकाणी पोहोचत आहेत. यावेळी अजित पवार देखील पोहोचतील असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे अजित तटकरे यांना घेऊन ट्रायडंट येथील बैठकीत जाणार आहेत. यावेळी धनंजय मुंडे हे देखील त्यांच्यासोबत आहे. श्रीनिवास पाटलांच्या घरी तटकरे आणि मुंडे हे अजित पवारांना आणण्यासाठी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात हे ट्रायडंटच्या दिशेने निघणार आहेत.