ठेकेदार कंपनी ब्लॅकलिस्ट, अधिकाऱ्यांवरही कारवाई, रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी वसई-विरार आयुक्त गंगाथरण डी. यांची थेट कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Contempt-plea-virar-.jpg)
मुंबई: ऐन पावसाळ्यात निकृष्ट रस्त्यांवर खड्डे पडून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वसई-विरारमध्ये देखील अशीच स्थिती पाहायला मिळालेली आहे. यानंतर वसई-विरार महापालिका आयुक्तांनी स्वतः रस्त्यांची पाहणी करण्यास सुरुवात केलेली आहे. यावेळी रस्त्यांची दुरावस्था आणि त्यात झालेला हलगर्जीपणा पाहून त्यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिलेला आहे. वसई विरार महापालिका क्षेत्रात रस्त्यातील खड्डे दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून आयुक्त गंगाथरण डी. यांनी ठेकेदाराला चांगलाच दणका दिला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना देऊनही काम न केल्याचं आयुक्तांच्या पाहणीत समोर आलेलं आहे. त्यानंतर आयुक्त गंगाथरण यांनी 2 इंजिनिअर आणि एका ठेकेदार कंपनीवर कारवाई केलेली आहे.
वसई विरारमधील रस्ता दुरुस्तीचे काम ठेकेदार कंपनी राठोड भगीरथी अँड कंपनी यांना देण्यात आले होते. त्यांना आयुक्तांकडून रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही आयुक्तांच्या रस्ते पाहणीत खड्ड्यांचे साम्राज्य आढळून आले. बुजावलेल्या खड्ड्यात निकृष्ट दर्जाचे पेव्हरब्लॉक लावल्याचेही उघड झाले आहे. त्यानंतर आयुक्तांनी तात्काळ या प्रकाराची दखल घेत मे. राठोड भगीरथी अँड कंपनी यांना महानगरपालिकेच्या ठेकेदार पॅनलवरुन काढून टाकले. ठेकेदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. संबंधित कामावर लक्ष ठेवणाऱ्या मिलिंद शिरसाट, कनिष्ट अभियंता (ठेका) यांना देखील कामावरुन कमी करण्यात आलेलं आहे.
एकनाथ ठाकरे, शाखा अभियंता यांना कामात हलगर्जीपणा केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. कारवाई झालेले दोन्ही इंजिनिअर आणि ठेका कंपनी वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती डीमध्ये कार्यरत होते. आयुक्तांच्या कारवाईमुळे कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर पावसामुळे प्रचंड खड्डे पडले आहेत. आयुक्तांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचं काम लवकरात लवकर करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागामार्फत महानगरपालिकेच्या पॅनलवरील ठेकेदारांकडून रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.