ठाणे शहरात लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढवण्याचे आदेश
ठाणे हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण सध्या मुंबईपेक्षा ठाण्यात जास्त आढळून येत आहेत. ही बाब लक्षात घेत ठाणे पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.
कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकलेल्या ठाणे शहरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यात आधीच १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता मात्र आता त्या लॉकडाऊन मध्ये वाढ करत आता १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. २ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेल्या या लॉकडाऊनची मुदत १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र ठाणे शहरातील कोरोनाची स्थिती गेल्या काही दिवसांत अधिकच गंभीर बनली आहे. लॉकडाऊन सुरू असतानाही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईपेक्षा ठाण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. ही बाब ध्यानात घेऊनच ठाणे पालिकेने कठोर निर्णय घेतला आहे.
१९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठाणे महापालिका हद्दीत लॉकडाऊन असेल, असे पालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.