जगेन असं वाटत नव्हतं पण सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो : छगन भुजबळ
मुंबई | “मला आज विश्वास बसत नाही. कारण मी जगेन असं मला वाटत नव्हतं, पण नियतीचा खेळ आहे. मी सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो आहे,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं. शिवतीर्थावर गुरुवारी (28 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या इतर सहा आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये छगन भुजबळ यांचा समावेश आहे.
शपथविधीनंतर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. छगन भुजबळ म्हणाले, “मी जगेन की नाही हे मला वाटत नव्हतं. पण मी सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो आहे. मला विश्वास बसत नाही.” तसंच “माझ्यासोबत जे झालं ते मी कधीच विसरलो आहे. पण मी कोणासोबतही सुडबुद्धीचं राजकारण करणार नाही, माझ्यासोबत कोणी आकसाने वागलं म्हणून मी कोणाशी तसा वागणार नाही, असं स्पष्टीकरणही भुजबळांनी दिलं.
राज ठाकरे साहेब बोलत होते मला विरोधी पक्षासाठी मत द्या. तर देवेंद्र फडणवीस बोलायचे विरोधी पक्ष संपला आहे. आता आम्हाला विरोधक मिळाले आहेत. आम्ही जिथे चूकणार तिकडे तुम्ही सांगायचं. पण विरोधाला विरोध चालणार नाही, अशी आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.