छोटा राजन गँगचा खतरनाक गँगस्टर डी.के.राववर कोर्टाच्या आवारात हल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/dkraon-rajan.jpg)
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन गँगचे दोन खतरनाक गँगस्टर मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात परस्परांना भिडल्याची घटना समोर आली आहे. दिलीप बोरा उर्फ डी.के.राव आणि अनिल पाटील यांच्यातील शाब्दीक वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले. खंडणी, हत्येचा प्रयत्न आणि हत्येच्या ३० गुन्ह्यांमध्ये डी.के.रावचे आरोपी होता. पण बहुतांश गुन्ह्यांमध्ये त्याची सुटका झाली आहे. दोनवेळा त्याने मृत्यूला चकवा दिला. एकदा चकमकीच्यावेळी त्याने मृत झाल्याचे भासवले होते.
राव आणि पाटीलला खंडणीच्या प्रकरणात गुन्हे शाखेने २०१८ मध्ये अटक केली. मोक्का कोर्टात त्यांच्यावर खटला सुरु आहे. सोमवारी दोघांना आर्थर रोड तुरुंगातून सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डी.के.राव विकासकाकडून पैसे मागवण्यासाठी अनिल पाटीलवर दबाव टाकत होता. राव आणि पाटील यांच्यासोबत दोन पोलिसांच्या टीम्स होत्या. दोघे चौथ्या मजल्याच्या पायऱ्यांवर सुनावणीच्या प्रतिक्षेमध्ये थांबले होते. त्यावेळी वादावादी झाली.
बिल्डरला माझ्याशी बोलायला सांग असे रावने अनिल पाटीलला सांगितले. पाटीलने डी.के.रावला होकार दिला. पण पाटीलचा बोलण्याचा स्वर डी.के.रावला अजिबात आवडला नाही. त्याने पाटीलला खालच्या पट्टीत बोलायला सांगितले. संतापलेल्या रावने पाटीलच्या डोक्यात मारले. पाटीलने सुद्धा डी.के.राववर हात उचलला असे सूत्रांनी सांगितले.
अनिल पाटीलची मुलं त्याला नैतिक पाठिंबा देण्यासाठी कोर्टात उपस्थित होती. त्यांनी सुद्धा राववर हात उचलला. त्यानंतर डी.के.राव मोक्का कोर्टात पळाला व विशेष न्यायाधीशासमोर तक्रार केली. कोर्टाच्या सुरक्षारक्षकांनी पाटील आणि त्याच्या मुलांना कोर्टरुममध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. न्यायाधीशांनी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सांगितले.