चित्रपटाची तिकिटे, टीव्ही यावरील जीएसटीत कपात
![The highest revenue in 2020 was collected in December, 12 per cent higher than last year](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/GST-Logo1.jpg)
मुंबई – चित्रपटाची तिकिटे, टीव्ही यावरील जीएसटीत कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. त्यामुळे या गोष्टींबरोबरच इतर सात वस्तू आता स्वस्त होणार आहेत.
जीएसटी परिषद शनिवारी नवी दिल्लीत झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आले. विविध वस्तूवरील जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.
१०० रुपयेपर्यंतच्या सिनेमाच्या तिकिटावरील जीएसटीत १८ टक्क्यावरून १२ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. १०० रुपयांपेक्षा जास्त तिकीटदर असलेल्या तिकिटावरील जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के करण्यात आला आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रिमिअमवरील जीएसटी १८ टक्क्यावरून १२ टक्के करण्यात आला आहे.
इकॉनॉमी दर्जाच्या विमान प्रवासावरील जीएसटी ५ टक्के आणि बिझनेस क्लास तिकिटावरील जीएसटी १२ टक्क्यापर्यंत घटवण्यात आला आहे. २८ टक्के करदरात असलेल्या ६ वस्तू स्वस्त होणार आहेत. यात मॉनिटर आणि टीव्ही स्क्रीन, टायर, पॉवर बँक, लिथियम बॅटरी स्वस्त होणार आहेत. बांधकाम क्षेत्रावरील जीएसटीचा आढावा पुढील परिषदेत घेतला जाणार आहे.