क्रॉफर्ड मार्केटजवळ भरधाव कारच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Egw6OmBVgAADcXn.jpg)
मुंबई – दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात कारच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. काल
रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ‘जनता कॅफे’समोर उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना कारने धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या चौघांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री भरधाव एस्टीम कारने क्रॉफर्ड मार्केटसमोरुन पुलाखालून मुख्य रस्ता पार केला. त्यानंतर जनता कॅफेला जोरदार धडक दिली. यावेळी हॉटेलसमोर आणि रस्त्यावर उभे असलेले अनेकजण जखमी झाले. जखमी झालेल्या 8 जणांना जवळच्या जेजे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र चौघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर चार जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच हॉटेलला धडक दिल्यानंतर कारच्या पुढच्या भागाचाही चेंदामेंदा झाला आहे.
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबत तपास करत आहेत.