‘कोविड योद्धा’ निवासी डॉक्टरांच्या पदव्युत्तर परीक्षांबाबत अमित ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई | मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज (२२ जून) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी ‘कोविड योद्धा’ असलेल्या निवासी डॉक्टरांच्या पदव्युत्तर परीक्षांबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती करणारे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अमित हे राजभवनात गेले होते. याआधी ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले होते.
अमित ठाकरेंनी पत्रात म्हटले, “संपूर्ण देशात कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. या वैद्यकीय लढाईत सुमारे २५०० निवासी डॉक्टर्स दिवसरात्र रुग्णसेवा बजावत आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण (डिग्री आणि डिप्लोमा अंतिम वर्ष) घेणारे विद्यार्थी – निवासी डॉक्टर्स गेले अडीच-तीन महिने प्रचंड तणावाखाली आहेत. सुस्पष्ट धोरणाअभावी परीक्षेची टांगती तलवार त्यांना छळत आहे. ही परीक्षा आता १५ जुलैपासून घेण्यात येणार आहे. हा निर्णय घेताना २४ तास रुग्णांसाठी उपलब्ध राहणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतांचा विचारही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केलेला नाही” असे अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.