“कोरोनाचं संकट येतंय असं वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकला”; राज ठाकरेंचा शिवसेनेला खोचक टोला
!["If Corona's crisis seems imminent, then the election has been postponed"; Raj Thackeray's attack on Shiv Sena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/raj-thakare.jpg)
मुंबई |
राज्य सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मनसेचे नेते आक्रमक झाले आहेत. आम्ही मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, असा खोचक टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे. मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: येऊन सही करणार आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकारही सहभागी होणार आहेत.
राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली. सरकारच्या निर्णयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देते. करोनाचं संकट येतंय असं वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
मराठी स्वाक्षरी मोहिमेबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी जनतेलाही आवाहन केलं. “मला असं वाटतं की स्वाक्षरीची मोहीम पहिल्यांदाच होत नाहीये. फक्त यावेळी मोठ्या प्रमाणात करण्याचं ठरवलं. माझी मराठीजनांना विनंती आहे की, आपली स्वाक्षरी मराठीत केली तर मराठीतून काहीतरी करतो हे मनात राहतं. मी सगळीकडे मराठीत सही करतो. प्रत्येक वेळेस आसवं गाळत बसण्यापेक्षा सुरूवात करणं गरजेचं आहे. दाक्षिणात्य माणसांबद्दलच नाही. सगळ्यांबद्दल बघा. दोन गुजराती जेव्हा एकत्र येतात.. तेव्हा ते गुजरातीमध्ये बोलतात. मराठी येतात तेव्हा ते अनेकदा हिंदीमध्ये बोलतात,” असं म्हणत राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाचा- मुलीला फसविणाऱ्या 24 वर्षीय युवकाला 22 महिन्यांची कैद