कुत्र्याला मारहाण करण्यापासून रोखल्याने सख्ख्या भावाची हत्या
![Mumbai,Woman doctor commits suicide,Took overdose of amnesia injection,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/murder-crime.jpg)
कुत्र्याला मारहाण करण्यापासून रोखल्याने आपल्या सख्ख्या भावाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विले पार्ले परिसरात ही घटना घडली आहे. भांडणादरम्यान आरोपीने आपल्या भावाला धक्का दिला होता, ज्यामुळे खाली जमिनीवर डोकं आपटल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री जवळपास 10.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंता कोळेकर शेजारच्या पाळीव कुत्र्याला मारहाण करत होता. यामुळे त्याचा भाऊ शिवा चिडला होता. त्याने हनुमंताला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अत्यंत रागात असलेल्या हनुमंताने शिवाला धक्का गेला. खाली पडला असता शिवाच्या डोक्याला मार लागला आणि बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेत शिवाला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं.
वडील बसुराज यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही भाऊ बेरोजगार होते. हुनमंता याला दारुचं व्यसन होतं आणि तो वारंवार कुटुंबीयांशी भांडत असे असं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. हनुमंताची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.