कळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड
मुंबई | कोरोना विषाणू महाराष्ट्रासह संपूर्ण देशात थैमान घालताना दिसत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. परिणामी, राज्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली पार पाडावी लागली आहेत.
महत्वाचे म्हणजे, दरवर्षी धुकधडाक्यात साजरा केला जाणारा गणेशोत्सवदेखील यंदा शांतेत पार पडला आहे. याच पार्श्वभूमीवर कळव्यात कोरोनाबाधितांची प्रतिदिन वाढणारी संख्या लक्षात नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुंबई, पुणे, ठाणे या शहरांत कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरत चालला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत कळव्यातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच दरवर्षी पारसिकनगर येथे साजरा करण्यात येणार सार्वजनिक नवरात्रौत्सव रद्द करावा, अशी विनंती स्थानिक नागरिकांनी जितेंद्र आव्हाड यांना केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.