कर्नाटकमध्ये १५ बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/1573713117.jpg)
मुंबई |महाईन्यूज|प्रतिनिधी|
कर्नाटकातील १७ पैकी १५ बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडीयुरप्पा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने या सर्व आमदारांना पुन्हा निवडणूक लढविता येऊ शकते, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कर्नाटकातील भाजपच्या मुख्यालयामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. असे सांगितले जात आहे की, येत्या ५ डिसेंबर रोजी १५ जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीला भाजप या बंडखोर आमदारांना पुन्हा तिकीट देऊ शकते. मस्की आणि राजराजेश्वरी या दोन मतदार संघामध्ये निवडणूक होणार नाही. कारण या मतदार संघासंबंधित याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात विचाराधीन आहे.
बुधवारी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना पुन्हा निवडणूक लढवण्याबाबत दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. येत्या ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप या १५ जागांवर विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय माजी सभापती आणि सिद्धरामय्या यांच्या कटाविरूद्ध आला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.