‘कंटेन्मेंट झोनमधील गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतींचे विसर्जन त्याच भागात करावं’- मुंबई महानगरपालिका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-92.jpg)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कंटेन्मेंट झोन भागातील गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतींचे विसर्जन त्याच भागात करावे. त्यासाठी तलाव किंवा कृत्रिम तलाव याचा वापर करावा. तसंच इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी घरच्या घरी गणपती विसर्जन करावे, अशा सूचना मुंबई महानगरपालिकेने केल्या आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना व्हायरसच संकटाचे सावट आहे. त्यामुळे विशेष खबरदारीसह अगदी साध्या स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलंय.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळ आणि घरगुती गणपती यांच्यासाठी राज्य सरकारकडून विविध नियम लागू करण्यात आले आहेत. तसंच मुंबईत अतिरिक्त कृत्रिम तलावांची देखील सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
दरम्यान, शर्थीच्या प्रयत्नांनंतर मुंबईतील कोरोना व्हायरस संसर्गाची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले आहे. तरी देखील संकट अद्याप टळलेले नसल्यामुळे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या मुंबईत सुरुवातीपासूनच अधिक होती. परंतु, आता रुग्ण दुप्पटीचा वेग मंदावला आहे. सध्या मुंबईत 92,988 कोरोना बाधित रुग्ण असून 64,872 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. तर 5,288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.