कंगनाला न्यायालयाचा धक्का, नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले
![Actress Kangana Ranaut's troubles escalate over controversial statement regarding Sikhs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/kangna.png)
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारविरोधात टीकास्त्र सोडण्याचीची मोहीम राबवणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिला न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. सदनिकांचे (फ्लॅट) अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.
उपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. एस.चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, “खार परिसरातील 16 मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना रनौत हिने आपले तीन फ्लॅट एकत्रित करताना नियोजित आराखड्यातील बांधकाम काढले आहे. त्यामुळे अन्य क्षेत्रही त्यात समाविष्ट केले. हे मंजूर योजनेचे गंभीर उल्लंघन आहे, ज्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे.’
तसेच, मुंबई महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून रोखण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या आदेशामुळे अभिनेत्री कंगना रनौत हिला मोठा झटका बसला आहे. मार्च 2018 मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकीने (BMC) तिच्या खार फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम कामासाठी अभिनेत्रीला नोटीस बजावली. पण त्यानंतर ही बाब मागे पडली होती.
दरम्यान, यापूर्वी बीएमसीच्या पथकाने अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपावरून कंगना हिच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्या विरोधात कंगना रनौत हिने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. तोडफोडी चुकीची असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला फटकारले होते.