ऑनलाईन बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – ॲड. यशोमती ठाकूर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/yashomati-thakur.jpg)
मुंबई | बालकांचे ऑनलाईन लैंगिक शोषण हा अतिशय संवेदनशील विषय असून याबाबत सर्वांनी एकत्रितरित्या काम करून बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची आणि ऑनलाईन महाजालातील बालकांच्या लैंगिक विषयाशी संबंधित बाबींना कायद्याच्या चौकटी खाली आणण्याची आवश्यकता महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालकांचा ऑनलाईन पद्धतीने होणारा लैंगिक छळ थांबविण्यासाठी धोरणात्मक बाबींची अंमलबजावणी’ या विषयावर काल राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे (ऑनलाईन चर्चासत्र) आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
ॲड. ठाकूर म्हणाल्या, इंटरनेटमुळे सर्व जग जवळ आणले आहे. इंटरनेटमुळे अनेक क्षेत्रात सकारात्मक क्रांती घडून आली आहे. मात्र, काही विकृत मनोवृत्ती त्याचा गैरवापरदेखील करत आहेत. बालकांचे होणारे ऑनलाईन शोषण ही देखील अशीच काळी बाजू त्याला रोखणे हे आपल्यापुढील आव्हान आहे. त्यासाठी केंद्रीय तसेच सर्व राज्यांच्या सर्व संबंधित संस्था आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय तसेच अन्य अशासकीय संस्थांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. ऑनलाईन बाललैंगिक शोषणाविरुद्ध कारवाईसाठी विशिष्ट कार्यप्रणाली तयार करून या सर्व संस्थांशी सामायिक (शेअर) केली पाहिजे. या वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिव श्रीमती सीमा व्यास यांनी या विषयाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यावर भर दिला. स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्नातून त्यासाठी महत्त्वाचे ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.