एसटीची ‘दिवाळी’
- प्रवासी भाडे सवलतीपोटी ६०७ कोटी रोखीने मिळणार
मुंबई-कर्मचाऱ्यांचा पगार, इंधन आणि अन्य खर्चाची आता एसटी महामंडळाला करणे शक्य होणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या विविध प्रवासी सवलतीपोटी येणे असलेली ६०७ कोटी रुपयांची शेवटची थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रकमेतून एसटीला खर्च भागविता येईल.
महामंडळाचे उत्पन्न आठ हजार कोटी रुपये तर खर्च आठ हजार ६०० कोटी रुपये आहे. ६०० कोटी रुपये तोटा होत असल्याने महामंडळाला खर्चही भागविणे कठीण जाते. त्यातच एसटी महामंडळ शासनाच्या धोरणानुसार प्रवाशांना भाडे सवलती दिल्या जातात. या सवलतींची रक्कम शासन महामंडळाला देते. या सवलतींपोटी दीड हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम शासनाकडून एसटीला येणे बाकी होते. ही रक्कम शासनाने प्रत्येक वर्षी टप्प्याटप्यात दिली. आता सवलतीपोटींची थकबाकी ६०७ कोटी ७४ लाख ७२ हजार ३९८ रुपये रोखीने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या दोन दिवसांत ही रक्कम एसटीकडे जमा होईल, अशी माहिती एसटीमधील सूत्रांनी दिली. सवलतींपोटीची थकबाकी देण्यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांबरोबर ऑक्टोबरमध्ये बैठकही घेतली होती.
एसटीचा पसारा
* १८ हजार बसगाडय़ा
* एक लाखाहून अधिक कर्मचारी
* ६५ लाखाहून अधिक प्रवासी
आर्थिक गणित
* उत्पन्न ८ हजार कोटी
* खर्च ८ हजार ६०० कोटी
* तोटा ६०० कोटी
विविध प्रवासी भाडे सवलतीपोटी एसटीला शासनाकडून ६०७ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे एसटीवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.