एनसीबीकडून रियाची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी ; फॉरेंसिक टीमचा तपास विष प्रयोगाच्या दिशेने
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अमली पदार्थ कनेक्शनचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एनसीबीने रिया चक्रवर्तीची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. तब्बल 8 तास तिला वेग-वेगळे प्रश्न विचारण्यात आले. यानंतर पुन्हा उद्या तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि हेल्पर दीपेश सावंत यांना समोरा-समोर बसवून प्रश्न विचारले.
एनसीबीने या प्रकरणी ड्रग पेडलर अनुज केसवानी याला अटक केली आहे. याचा सुगावा कैझान इब्राहिमची चौकशी करताना लागला होता. आतापर्यंत या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, एम्सच्या फॉरेन्सिक बोर्डाचा अहवाल व्हिसेरा अहवाल 10 दिवसांनंतर येणार आहे. फॉरेन्सिक टीम या प्रकरणी विष प्रयोगाचा अँगल सुद्धा तपासत आहे.
एनसीबीचे उप-महासंचालक (दक्षिण-पश्चिम क्षेत्र) एम अशोक जैन यांनी सांगितल्याप्रमाणे, मी सध्या सविस्तर माहिती देऊ शकत नाही. कारण, मीडियाकडून आम्हाला बरीच माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांना फोन चॅटिंगचे रेकॉर्ड मिळाले आहेत. यातून प्रतिबंधित ड्रग्स खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
रियाने पोलिसांत सुशांतची बहीण प्रियंकाच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार आणि इतर दोघांचीही नावे आहेत. या लोकांच्या विरोधात नारकोटिक्स ड्रग्स अँड साइकोट्रॉपिक सब्सटेंसेज अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी तिने केली. रियाच्या आरोपानुसार, प्रियंकाने 8 जून रोजी सुशांतला डॉ. तरुण यांनी लिहिलेली चिठ्ठी पाठवली होती. त्यामध्ये कायदेशीर सल्ला न घेताच औषधी घेण्यास सांगितले होते.