एटीएम कार्डची माहिती चोरणारी टोळी गजाआड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/atm-swapping.jpeg)
मुंबई | महाईन्यूज
पेट्रोल पंपावर डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे देयकांचा भरणा करणाऱ्या ग्राहकांच्या बँक खात्याची माहिती चोरी करून बनावट एटीएमच्या साहाय्याने खात्यातून पैसे लंपास करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. रितेश अग्रवाल (२७), हैदर शेख (२३), राजेश गौडा (३५), उमेश लोकरे (२५) यांना पोलिसांनी अटक केली आहे.मुलुंड परिसरातील एका व्यक्तीच्या एटीएमची माहिती चोरून बँक खात्यातून पैसे वळते केल्याचा गुन्हा ४ जानेवारीला मुलुंड पोलिसांनी नोंदविलेला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ८ ने समांतर तपास सुरू केलेला आहे.
अशा पद्धतीने चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच रितेश आणि त्याचे साथीदार अंधेरी परिसरातील एटीएममधून पैसे काढणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी चार वेगवेगळे गट नियुक्त करून आरोपींचा शोध सुरू केला होता. तसेच सीसीटीव्हींच्या माध्यमातून परिसरात पाळत ठेवली आहे. त्या वेळी अंधेरी-कुर्ला रस्त्यावर विशाल हॉलजवळ एक लाल रंगाची कार संशयास्पदरीत्या उभी असलेली पोलिसांना आढळून आली. त्यांनी ही कार अडवून तिची तपासणी केली आहे. त्यांच्याकडे मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड रायटर, मॅग्नेटिक कार्ड रायटर, एक डोंगल, ८ विविध बँकांचे बनावट एटीएम कार्ड आणि ४ मोबाइल फोन पोलिसांना सापडले. यातील मुख्य आरोपीला भोपाळ येथे याच प्रकारच्या गुन्ह्य़ात अटक झालेली आहे.