उसने पैसे परत न केल्याने मुंबईतील व्यापाराचे अपहरण, पुण्यातून चौघांना अटक
![20 years hard labor for torturing a minor girl](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Arrest.jpg)
मुंबई: उसने दिलेले पैसे परत न केल्याने एका व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. अवघ्या 24 तासात पुण्यातून या चार जणांना अटक करण्यात आलेली आहे. मुलुंडमध्ये राहणारे व्यापारी विरल लालन यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यावसायात मार्केटिंगचे काम करणारे रोहित बाबासाहेब घारे, महेश नारायण जोंधळे, रोहन कुमार गराडे आणि आकाश लक्ष्मण करंजावणे यांच्याकडून 5 लाख रुपये उधार घेतलेले होते. विरलकडे ते वारंवार पैशाची मागणी करत होते. मात्र लॉकडाऊन असल्याने माझ्याकडे पैसे नाही, असे तो त्यांना सांगत होता.
त्यामुळे त्या चार जणांनी त्याचे अपहरण करुन त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे मागण्याचा डाव रचला . यातील रोहित आणि महेशने त्याला अंधेरीला कामानिमित्त बोलावून घेतले होते. त्यांनी त्याला गाडीत टाकून पुण्याच्या दिशेने निघाले होते. रस्त्यात त्यांना रोहन आणि आकाश येऊन मिळाले होते. त्यांनी विरलचे वडील राजेश लालन यांना फोन करुन पैसे देण्याची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाही तर मुलाला मारुन टाकू अशी धमकी दिली. राजेश यांनी याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार करताच अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथके तयार करुन तांत्रिक माहितीच्या मदतीने या आरोपींचा पाठलाग केला आहे. त्या चार जणांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेले आहे. विरल लालन याची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. मुलुंड पोलिसांनी अवघ्या 24 तासात या अपहरणाचा छडा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.