इमारतीवरही पार्टी करण्यास मनाई, 35 हजार पोलीस राहणार बंदोबस्ताला
![Article 144 is applicable in Mumbai; New Year party cannot be held](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/new-year-party.jpg)
मुंबई – मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असली तरी कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी होऊ नये म्हणून महापालिकांच्या हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच आता इमारतीच्या गच्चीवरही पार्टी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले मुंबई पोलीसही यंदा विशेष सतर्क असणार आहेत.
वाचा :-‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणी त्वरित खुलासा द्यावा – गृहमंत्री अनिल देशमुख
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यावर ३५ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. “नव वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी तसेच कोविड-१९ नियमांचे काटेकोटरपणे पालन होतेय की, नाही त्यावर तैनात पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल” असे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
नाइट कर्फ्यूच्या निर्बंधामुळे हॉटेल, पब रात्री ११ वाजता बंद करावे लागतील. जर असे केले नाही, तर परिणाम भोगावे लागतील. नियमांचे पालन न करणाऱ्या मालकांवर तसेच कोणीही आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल.
वाचा :-मुंबईत थंडीचा पारा कमी, राज्यात मात्र हुडहुडी कायम
“नाइट कर्फ्यूच्या आदेशानुसार, पाच पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येणावर बंदी आहे. लोक त्यांच्या कुटुंबासोबत बाहेर पडले आणि चार किंवा त्यापेक्षा कमी जण असतील, तर काही अडचण नाही” असे नागरे पाटील म्हणाले. “निर्बंध असले तरी, मुंबईकरांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी गेट वे ऑफ इंडिया. मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, गोराई आणि मढ या ठिकाणी संध्याकाळपासून जाऊ शकतात. पण छोटया गटाने, चारपेक्षा कमी लोक असले पाहिजेत. पोलीस या ठिकाणी गर्दी जमू देणार नाहीत” असे नांगरे पाटील म्हणाले.
बोटीवर तसेच गच्चीवर पार्ट्यांना परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजकांवर आणि गर्दीवर कारवाई करण्यात येईल असे नागरे पाटील यांनी सांगितले. छेडछाडीच्या, त्रास देण्याच्या घटना रोखण्यासाठी विविध ठिकाणी विशेष पथक तैनात असेल. घातपाताचा धोका लक्षात घेऊनही मुंबई पोलीस सज्ज आहेत. बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच ड्रींक अँड ड्राइव्ह विरोधात वाहतूक पोलीस दरवर्षीप्रमाणे मोहिम राबवतील.