इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 450 फूट उंचीच्या पुतळ्यास सरकारची मान्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/dr-ambedkar-indu-mill-smarak.png)
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या 450 फूट उंचीच्या पुतळ्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. या स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवण्यात आल्याने खर्चात 300 कोटी रुपयांची वाढ होणार आहे. या आंतरराष्ट्रीय स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 450 फूट उंचीचा पुतळा असणार आहे. यात पॅडस्टल 30 मीटर असून निव्वळ पुतळ्याची उंची 350 फूट असणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी केलेली होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केलेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीत वाढ करण्यात आल्याने स्मारकाच्या खर्चातदेखील मोठी वाढ झालेली आहे. याअगोदर आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी 763 कोटी रुपये खर्च करण्यात येणार होता. मात्र, आता यात वाढ होऊन हा खर्च 1 हजार 89 कोटी 95 लाख इतका झालेला आहे. दरम्यान, 2013 मध्ये इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय भव्य आंबेडकर स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. या स्मारकासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) हे नियोजन प्राधिकरण आहे. याशिवाय या स्मारकाचे कंत्राट एल अँड टी कंपनीला देण्यात आले असून वास्तुविशारद शशी प्रभू आंबेडकरांचा पुतळा बनवणार आहेत.