आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा ; हायकोर्टाने फेटाळल्या सर्व याचिका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/HC.jpg)
महा ई न्यूज | मुंबई :
आरेतील कारशेड प्रकरणी राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. आरेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारण्यासाठी जवळपास अडीच हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याविरोधात अनेक पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र या सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या.
आरेतील कारशेड उभारणीसाठी कराव्या लागणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवादी आणि स्थानिकांनी विरोध दर्शवला. आरेतील प्रस्तावित कारशेड इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. यासाठी अनेक सेलिब्रिटीदेखील रस्त्यावर उतरले होते. मात्र राज्य सरकार आरेतील कारशेडवर ठाम होते. आरेत केवळ झाडे असल्याने त्या भागाला जंगल म्हणता येणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. सरकारचा हा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने कारशेडविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळल्या.