breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आरेचं जंगल आता 800 एकरांचं तर मेट्रो कारशेड कांजूरला होणार

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरेची ८०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली. तसेच मेट्रो कारशेड आरेमध्ये होणार नसून कांजूर येथे होणार असल्याची महत्तपूर्ण माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘आरेमधील घरांवर, आदिवासी पाड्यांवर, त्यांच्या अधिकाऱ्यांवर किंचितही गदा येऊ न देता तेथील जवळपास ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली. आता या जंगलाची व्याप्ती ६०० वरून ८०० वर गेली आहे. असे जगात शहरामध्ये कुठेही जंगल नसेल. जंगलात शहर होतात, मात्र शहरात जंगल नसेल’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर ‘आरेमध्ये जे कारशेड होणार होते ते आता कांजूरला होणार आहे. कांजूरला असलेली सरकारी जमीन शून्य रुपये किंमतीने कारशेडसाठी दिली आहे. ही सरकारी जमीन जनतेसाठी आपण वापरणार आहोत. त्यामुळे कांजूरला एक रुपया खर्च होणार नाही’, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच ‘आरेमध्ये कारशेडचे जे काही काम झाले, तिथे खर्च केलेले पैसेही वाया जाणार नाहीत’, असे त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे ‘थापा मारून एवढी झाडं लावली, तेवढी झाडं लावली, अशी खोटी झाडं मला लावता येत नाहीत, तर आपण पर्यावरण जपणे हे ऐतिहासिक काम केले आहे’, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मागील फडणवीस सरकारला लगावला.

त्याचबरोबर सततच्या पावसाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हटले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, ओल्या दुष्काळाची भरपाई देणार, तसेच आवश्यकतेनुसार गोदामे, शीतगृहे दिली जातील आणि त्यानंतर चांगल्या बाजारपेठेचीही व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कृषी धोरणात आपले फायदे काय आणि तोटे काय यावर विचार सुरू आहे, असे सांगत ‘जो काही कायदा आलाय तो जोरजबदरस्तीने जशाच्या तास स्वीकारणार नाही. त्यातील शेतकरी हिताच्या गोष्टी स्वीकारणार मात्र शेतकऱ्याला तोटा होणार असेल तर ते स्वीकारणार नाही’, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी आजही जनतेला कोरोनापासून वाचण्यासाठी नियमित मास्क वापरा, चेहऱ्याला हात लावू नका, खबरदारी घ्या, अशा सूचना केल्या. ते म्हणाले, ‘लस येईल तेव्हा येईल मात्र तोपर्यंत आपण खबरदारी घेऊया. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो.’ तसेच आपण इंग्रजांना पळवून लावणाऱ्यांचे वंशज आहोत, आपण कोरोनाला नाही पळवू शकत का, असा विश्वासही त्यांनी जनतेला दिला. त्याचबरोबर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेत कार्यरत असणाऱ्या सर्व सेविका, सेवक, डॉक्टर, पोलीस यांच्यासह जनतेचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

दरम्यान, लोकल कधी सुरू होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत आज मुख्यमंत्री म्हणाले, ‘लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची आपण मागणी करत आहोत. लोकल फेऱ्या वाढल्या तर अधिक लोकांना त्यातून प्रवास करण्याची परवानगी देऊ.’ मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य आणि राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वसामान्यांसाठी लोकल इतक्यात खुल्या होणार नाहीत असे दिसते आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button