breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अलिबागच्या कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा चव्हाटय़ावर

अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयातून शुक्रवारी दोन कैद्यांनी पलायन केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही कैद्यांना पकडण्यात यश आले. पण जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून कैदी पळून जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही अशा घटना अलिबाग कारागृहात घडल्या आहेत. त्यामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.

अलिबागच्या मध्यवर्ती कारागृहातून बलात्काराच्या गुन्ह्यत अटकेत असलेले दोन कैदी शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास पळाले. कारागृहाच्या भिंतीवरून या दोघांनी उडी मारली. यातील एक जायबंदी झाल्याने पोलिसांच्या तावडीत सापडला. तर दुसरा पळून गेला. रात्री उशीरा त्याला कोलाड जवळ पोलिसांनी अटक केली. मात्र या घटनेमुळे तुरुंग व्यवस्थापनातील त्रुटी उजागर झाल्या आहेत. दुपारी अडीच वाजता कैद्यांसाठी अन्न धान्य उतरवण्याचे काम सुरु होते. या गडबडीत दोन्ही कैदी पळून गेल्याचे तुरुंग प्रशासनाने पोलिसांना सांगण्यात आले. मात्र दुपारी १२ ते ३ या कालावधीत कारागृहातील कैद्यांना बॅरेकमधून बाहेर सोडले जात नाही. मात्र तरीही या कैद्यांना बॅरेकमधून बाहेर काढण्यात आले. दुसरी महत्वाची बाब म्हणजे ज्या कैद्यांवर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यांच्याकडून तुरुंगातील काम करून घेणे अपेक्षित नाही. मग या दोन्ही अंडर ट्रायल आरोपींना बाहेर कसे काढले गेले असा प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.

जेलच्या तटबंदीवर जाणाऱ्या मार्गावर कैद्याना जाता येत नाही. तिथे तुरुंग कर्मचारी कायम तैनात असतात, मग हे दोघे तरुंग प्रशासनाचा डोळा चुकवून तटबंदीवर कसे चढले? हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेच असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

याबाबात कारागृह अधिक्षक ए. टी. पाटील यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली आहे.

हिराकोट तलावाजवळील ऐतिहासिक किल्लय़ात किरकोळ बदल करून तिथे या कारागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. ८० ते १०० कैद्यांची क्षमता असलेल्या या छोटेखानी कारागृहात कायमच दिडशे ते दोनशे कैदी ठेवले जातात. अतिशय अपुऱ्या जागेत या कैद्यांना इथे राहावे लागते.

कैद्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हे कारागृह कुचकामी ठरत आहे. त्यामुळे तळोजा जेलच्या धर्तीवर अलिबाग येथे नवीन मोठे कारागृह उभारण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने त्याला गांभिर्याने घेतलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button