अमली पदार्थ विक्रेत्या महिलांवर नजर
![570 grams of heroin worth Rs 60 lakh seized from narcotics cell in Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/drugs-1.jpg)
- महिनाभरात ११ महिलांना अटक
अमली पदार्थाची निर्मिती आणि पुरवठा करणाऱ्या साखळीवर आघात केल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने शहरातील किरकोळ विक्रेत्यांना रडावर घेतले आहे. त्यातही महिला विक्रेत्यांवर पथकाची विशेष नजर आहे. ऑगस्ट महिन्यात शहरात विविध ठिकाणी कारवाया करून पथकाने ११ छोटय़ा-मोठय़ा महिला विक्रेत्यांना बेडय़ा ठोकल्या आहेत.
गेल्या वर्षी अमली पदार्थविरोधी पथकाने एमडीचे उत्पादक, वितरक, बडे पुरवठादारांना शिताफीने अटक केली. त्यापाठोपाठ चरस, गांजा आणि कोकेनच्या वितरण साखळीविरोधात धडक मोहीम उघडली. या साखळीविरोधात सुमारे ६५ गुन्हे नोंद झाले, आरोपींना अटक केली गेली आणि त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थाचा साठा हस्तगत केला गेला. या कारवाईमुळे सध्या अमली पदार्थाचा मोठा साठा पोचता करण्यास निर्माते, वितरक आणि त्यांचे वाहक (कॅरिअर) नकार देतात. त्यामुळे आता पथकाने शहरातील छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांविरोधात आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या वर्षी विशेषत: जुलै, ऑगस्ट महिन्यांपासून पथकाच्या विविध कक्षांनी हद्दीतल्या किरकोळ प्रमाणातील अमली पदार्थ थेट ग्राहकांना उपलब्ध करून देणाऱ्या विक्रेत्यांची धरपकड सुरू केली आहे.
ऑगस्ट महिन्यात पथकाने भांडुप, वरळी, गोरेगाव, सांताक्रूझ, वांद्रे या परिसरात छापे टाकून २१ विक्रेत्यांना अटक केली. त्यात ११ महिलांचा समावेश आहे. वरळी पथकाने नाशिकहून गांजाचा साठा मुंबईत आणणाऱ्या लता चौरे या महिलेला बेडय़ा ठोकल्या. तिच्याकडून १० किलो गांजा हस्तगत केला गेला. लताने गेल्या दोनेक महिन्यांमध्ये मुंबईच्या १५ ते २० वाऱ्या केल्या. आरोग्यसेविकेच्या वेशात तिने गांजाचा किरकोळ साठा दडवून मुंबईत आणल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. तिने हा साठा वरळीतल्या किरकोळ विक्रेत्यांच्या मागणीनुसार आणला होता. त्यापैकी राणी बरसैया या विक्रेतीला अटक केली. राणी पूर्वी गावठी दारूचा गुत्ता चालवत असे. मात्र कालांतराने ती गांजा विक्रीत उतरली.
महिलांचा मोठय़ा प्रमाणात वापर
पथकातील एका अनुभवी अधिकाऱ्यानुसार गावठी दारूचा गुत्ता चालवणाऱ्या बहुतांश महिला सध्या अमली पदार्थ विक्रीत सक्रिय आहेत. नाकाबंदी, धरपकडीत महिलांकडे पाहाण्याचा पोलिसांचा दृष्टिकोन वेगळा असतो. महिला, लहान बालकांना घेऊन प्रवास करणारी वाहने नाकाबंदीतून सहज सुटतात. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तर महिला विक्रेत्या कपडे फाडतात आणि पोलीस पथकावर विनयभंगाचा आरोप करतात. असे प्रकार वारंवार मुंबईत घडतात.