अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून ट्रान्स हार्बर मार्गावरही लोकल!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Pune-local.jpg)
मुंबई | मुंबईची लाईफलाईन लोकल जवळपासून मागील चार महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. मात्र राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई विभागातील मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर सध्या ३५० निवडक उपनगरीय सेवा चालविण्यात येत आहेत. त्यात आजपासून आणखी दोन सेवा ठाणे-वाशी दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच्या निवडक उपनगरीय सेवा आता ३५२ होणार आहेत.
आजपासून वाशी स्थानकात जाणारी विशेष ट्रेन ठाणे येथून सकाळी निघेल तर ठाण्याकरिता विशेष ट्रेन वाशी स्थानकातून संध्याकाळी सुटणार आहे. या विशेष ट्रेन रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे आणि सानपाडा या स्थानकांवर थांबतील.
दरम्यान, राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली असून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य प्रवाशांनी स्थानकांवर गर्दी करू नये तसेच कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान कोविड-१९च्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.