अखेर मुंबईतील बेपत्ता पाच विद्यार्थिनी सापडल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/palika-school-.jpg)
मुंबई – कुलाबा येथील फोर्ट कॉनव्हेंट स्कूल या शाळेतून पाच मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्या दुपारी कुर्ला स्थानकात सापडल्या आहेत. या पाचही मुली आठवीत शिकणाऱ्या होत्या. शुक्रवारी या मुलींचे ओपन हाऊस होते. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे या मुली शुक्रवारी दुपारी 2.30 वाजल्यापासून बेपत्ता झाल्या होत्या.
परीक्षेत गुण कमी मिळाल्याने त्या नाराज झाल्या. त्यांची शाळा दुपारी अडीच वाजता सुटल्यावर घरी न जाता त्या गिरगाव चौपाटीला गेल्या. त्यानंतर हॅंगिग गार्डन परिसरात काही वेळ घालवल्यावर या पाचही मुली दादरला गेल्या. आज दुपारी 4.30 च्या सुमारास या पाचही मुली कुर्ला स्थानकात रडत बसल्या होत्या.
या मुलींच्या नातेवाईकांपैकी एकाने त्यांना पाहिले आणि पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या मुलींना पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्यांचा जबाब नोंदवून घेतला आणि या सगळ्या मुलींना त्यांच्या घरी पाठवण्यात आले.